
मुंबई : साऊथ सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट बुधवार, २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून २१ ऑगस्टपासून ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. ॲडव्हान्स बुकिंगला पाच दिवस पूर्ण झाले असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यावरुन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोठी कमाई करण्यास सज्ज आहे.
यशचा 'टॉक्सिक अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. यशचे चाहते या चित्रपटासाठी अत्यंत उत्सुक आहेत. तिकिटांची आगाऊ बुकिंग आधीच सुरू झाली आहे. २५ ऑगस्ट पर्यंत कन्नड, हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील मिळून ९ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. गेल्या २४ तासांत २.६५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.
'टॉक्सिक' हा एक 'पिरियड ड्रामा' आहे. ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या याच्या ट्रेलरमध्ये यश एका जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसून येतो. या ट्रेलरमध्ये कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत यांचीही झलक पाहायला मिळते. या सर्व अभिनेत्रींनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिली आहे. प्रेक्षकांचा मिळणारा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहता, व्यापार विश्लेषकांचा असा अंदाज आहे की 'टॉक्सिक' बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांची 'ग्रॉस ओपनिंग' (प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीची एकूण कमाई) नोंदवू शकतो. प्रेक्षक ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर या चित्रपटाची तिकिटे बुक करू शकतात.














