
कुडाळ : कुडाळ नगरीचे आराध्य दैवत आणि आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सिंधुदुर्गच्या राजा'चे यंदाही अत्यंत भव्य आणि नयनरम्य वातावरणात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने संपूर्ण कुडाळ शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
यंदा 'सिंधुदुर्गच्या राजा'ची स्थापना तब्बल १७ दिवसांसाठी केली जाणार असून, या संपूर्ण कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणे हा उत्सव केवळ धार्मिक पूजा-अर्चनेपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा ठरणार आहे. १७ दिवसांच्या या महोत्सवात परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रतपासणी, भव्य रक्तदान शिबिर आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे आरोग्य मार्गदर्शन सत्र, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संगीत रजनी, पारंपरिक भजनांचे सामने, लोककला, नृत्य आविष्कार आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम असे उपक्रम राबवले जाणार आहेत.
आमदार निलेश राणे यांनी कुडाळमध्ये 'सिंधुदुर्गच्या राजा' या सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी केली. जिल्ह्यातील जनता, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांना एका व्यासपीठावर आणून सांस्कृतिक एकता वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश होता. दरवर्षी हा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा केला जातो.
सिंधुदुर्गचा राजाच्या आगमनाच्या वेळी दादा साईल (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद), प्राजक्ता बांदेकर (नगराध्यक्षा, कुडाळ), दीपक नारकर (सदस्य, जिल्हा परिषद), रुपेश कानडे (सदस्य, जिल्हा परिषद), दीपलक्ष्मी पडते (सदस्य, जिल्हा परिषद), आनंद शिरवलकर (उप जिल्हाप्रमुख), संजय वेंगुर्लेकर (तालुकाध्यक्ष, भाजप कुडाळ), पप्या तवटे, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, कुडाळ शहर आणि परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. १७ दिवसांच्या या प्रदीर्घ उत्सवामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.










