LIVE UPDATES

Leopard Terror : खांबाळे चव्हाटेवाडीत मादी बिबट्यासह दोन पिल्लांचे दर्शन

वनविभागाचे पथक दाखल; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 19:49 PM
views 30  views

वैभववाडी : खांबाळे चव्हाटेवाडी येथील लोकवस्तीत शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले दिसून आली. वस्तीतच बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शनिवारी (ता. १२) सायंकाळी वनविभागाचे पथक गावात दाखल झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

खांबाळे गावातील दोन तरुण दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास चारचाकी वाहनातून कोकिसरे ते खांबाळे असा प्रवास करीत होते. त्यावेळी खांबाळे बौद्धवाडीनजीक रस्त्याच्या कडेला बिबट्या बसलेला त्यांना दिसला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ गावात व्हायरल झाला होता. मात्र, शुक्रवारी रात्री चव्हाटेवाडी येथे मादी बिबट्या आणि दोन पिल्ले लोकवस्तीतून रस्त्याच्या दिशेने जाताना दिसल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे.

चव्हाटेवाडीतील एक महिला शुक्रवारी रात्री घराजवळून जात असताना तिला मादी बिबट्या व दोन पिल्ले दिसली. बिबट्याचे दर्शन होताच घाबरलेल्या महिलेने तेथून धाव घेतली. त्यानंतर तिने याबाबत गावातील नागरिकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला घटनेची कल्पना दिली. 

या माहितीच्या आधारे शनिवारी सायंकाळी वनपाल सुरेश पटकारे, कणकवली जलद कृती दलाचे रिद्धेश तेली, मयूर राणे, विठ्ठल बिडये, हरेष सावंत, निलेश मोर्ये आणि रामदास घुगे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्यासह गुरुनाथ गुरव, गणेश पवार, महादेव पवार, रूपेश कांबळे, उमेश पवार, रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला बिबट्याच्या दर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पथकाने परिसरातील नागरिकांशी संवाद साधून बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे पथक खांबाळे येथे थांबवून परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.

गणेशोत्सवातील रात्रीच्या वर्दळीमुळे चिंता

गणेशोत्सवानिमित्त गावात रात्रीच्या वेळी आरती, भजन तसेच एकमेकांकडे ये-जा करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत लोकवस्तीत मादी बिबट्या आणि दोन पिल्ले दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, बिबट्याचा वावर आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.