LIVE UPDATES

पाणीपुरवठा विभागाचे रजिस्टर गायब

कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल | आरोप असणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच तक्रार | भ्रष्टाचारात कुणाची पडणार 'विकेट' ?
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 13, 2026 12:47 PM
views 23  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर परस्पर ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी  जोडाऱ्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान घडली असून १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऑडीसाठी दीड लाख पुरवठादाराकडून घेण्याऱ्या अधिकाऱ्याकडूनच याबाबतची तक्रार पोलीसात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी नगरपालिकेतील कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी रजेवर असताना या संधीचा फायदा घेत नगरपालिकेतील पद जोडारी (प्लंबर) म्हणून कार्यरत असलेल्या भारत बाबू लाखे (वय ५६, रा. लाखे वस्ती, सावंतवाडी) यांनी पाणीपुरवठा विभागाची नोंद व वापर रजिस्टर्स हाताळली. त्यातील नोंदी नष्ट करण्याच्या अथवा लपवण्याच्या उद्देशाने हे रजिस्टर्स एका पिशवीत ठेवून त्यांची विल्हेवाट लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागातील अधिकारी संजय गोविंद पोईपकर (वय ५१, रा. वझरवाडी, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भारत लाखे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि हर्षद हिंगे करत असून आरोपीला अटक करण्याची तजवीज पोलीस करत आहेत.

दरम्यान, यातील तक्रारदार अधिकाऱ्यावर या अपहारात पुरवठा दाराकडून ऑडीटसाठी दीड लाख घेतल्याचा आरोप आहे. सभेमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांसह पाणी पुरवठा समिती समोर त्यांनी याबाबतची कबुलीही दिली आहे. तर पुरवठा दाराने देखील पैसे दिल्याचे स्थायी समितीत मान्य केले. मात्र, असं असताना दुसरीकडे तेच जोडारी याच्या विरोधात तक्रार देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच प्रभारी मुख्याधिकारी यांच्यावर देखील बील काढण्यासाठी घाई करत असल्याचा आरोप मासिक सभेत पाणी पुरवठा समितीच्या सदस्यानेच जाहीरपणे केला होता. त्यात पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सभागृहात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा सगळा प्रकार बघता हे पाणी चांगलच मुरलेल दिसून येत असून या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी यापूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे येथील नागरिकांकडून देखील मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेकांची 'विकेट' पडण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक पातळीवर विरोधात असणारी शिवसेना महायुतीत एकत्र आहे. त्यामुळे या प्रकरणात शिवसेनेची भुमिका महत्वाची ठरणार आहे‌.  या प्रकरणात केवळ जोडारी नाही तर अनेकांचे हात बरबटल्याची चर्चा आहे. सावंतवाडी न.प. ही निष्कलंक राहिलेली असताना आता झालेल्या या भ्रष्टाचारामुळे याला डाग लागत आहे‌. त्यात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज यांचा वारसा आपल्याला लाभला असून वेळप्रसंगी कठोर निर्णय घेईन असा इशाराच दिलाय. त्यामुळे या पाण्यात कुणाची 'नाव' तरणार अन् कुणाची 'नाव' बुडणार ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. 

पोलिसांकडून सखोल चौकशीची अपेक्षा !

या प्रकरणात रजिस्टर गहाळ झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेत संपूर्ण परिसर, कार्यालये ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असताना रजिस्टर गहाळ करण्याची हिंमत केली जात असल्याने प्रवेशद्वारापासून ते स्टॉक रूम पर्यंतच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी होत आहे. यात खरा सुत्रधार समोर येणार असून पोलीसांसमोर ते शोधण्याच आव्हान आहे.