LIVE UPDATES

देवगड येथील राष्ट्रीय लोक अदालतीत १०५ प्रकरणे निकाली

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 20:30 PM
views 21  views

देवगड : येथील दिवाणी न्यायालय 'क' स्तर येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत एस. पचंडी यांच्या हस्ते झाले. उच्च न्यायालय मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा १११० पैकी एकूण १०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २५ लाख ३३ हजार ४८५ रूपये वसुली झाली.

देवगड तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिल एम. जी. काळदाते, ॲड. देवानंद गोरे, ॲड. अविनाश माणगांवकर, ॲड. आशिष लोके, ॲड. गिरीष भिडे, ॲड. कौस्तुभ मराठे, ॲड. अमेय गुमास्ते, ॲड. मैत्री खोबरेकर, ॲड. आरती दामले, ॲड. अनुराग बापट यांच्यासह दिवाणी न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, बँकांचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील एकूण ३५१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २ लाख ८३ हजार ७८ रूपये वसुली झाली. बँक, महावितरण यातील ७६० वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ७० प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण २२ लाख ५० हजार ४०७ रूपये वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून ॲड. संगीता कालेकर यांनी काम पाहिले.