LIVE UPDATES

FDA Raid : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात 'एफडीए'ची धडक मोहीम

कुडाळसह जिल्हाभरात अन्न आस्थापनांची तपासणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 12, 2026 20:39 PM
views 45  views

कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने जिल्हाभरात विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत प्रशासनाने भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.

गणेशोत्सवात प्रसाद म्हणून सर्वाधिक मागणी असलेल्या मोदक, पेढा, खवा, खव्याचे पदार्थ, तेल, तूप, मैदा आणि दूध या घटकांवर 'एफडीए'चे विशेष लक्ष आहे. यासोबतच स्थानिक बेकरी पदार्थ आणि फरसाण तयार करणाऱ्या आस्थापनांचीही काटेकोर तपासणी केली जात आहे.

विविध तालुक्यांत कारवाई; अन्न नमुने विश्लेषणासाठी रवाना

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत कुडाळ, सावंतवाडी, कणकवली आणि वैभववाडी शहरांसह विविध भागांत तपासणी सत्र सुरू झाले आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक अन्न आस्थापनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून मोदक, पेढे, तेल, मैदा, तूप, डाळी, बेसन, रवा व दूध यांचे अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसांत या मोहिमेला अधिक वेग दिला जाणार असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्व अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता राखण्यासोबतच अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सक्त निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.