LIVE UPDATES

कुडाळ येथे २७ जून रोजी भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’

३५२ वर्षांपूर्वीचा इतिहास हुबेहूब जिवंत होणार!
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 18:19 PM
views 35  views

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा आणि प्रत्येक शिवप्रेमीचे डोळे दीपवणारा ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा अनुभवण्याची सुवर्णसंधी कुडाळवासीयांना मिळणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या शनिवार, दिनांक २७ जून (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी सायंकाळी ५:३० वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये एका भव्य-दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ३५२ वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा जसाच्या तसा हुबेहूब या कार्यक्रमात साकारला जाणार आहे. त्या काळातील प्रमुख सरदार आणि उमरावांच्या उपस्थितीचे हुबेहूब सादरीकरण उपस्थितांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, ज्यांनी रायगडावर पहिल्यांदा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात केली, ते इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष रवीराज पराडकर स्वतः उपस्थित राहून या ऐतिहासिक गाथेची रंजक माहिती सांगणार आहेत. या अभूतपूर्व सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून हेमंत मुजुमदार जबाबदारी सांभाळणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि प्रत्येक शिवप्रेमीला अभिमानाचा अनुभव देणारा ठरणार आहे. तरी, तमाम शिवप्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शनिवार, २७ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आणि पत्रकार परिषदेला विवेक पंडित, नगरसेविका संध्या तेरसे, डॉ. बापू भोगटे, रमाकांत नाईक, बंड्या सावंत, डॉ. कमलेश चव्हाण, राजू राऊळ, शिवम महाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.