
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव येथे सुमारे ५ ते ६ वर्षे सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायावर नागरिकांच्या तक्रारीवरून वेंगुर्ला तालुक्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अतूल जाधव यांनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी धडक कारवाई केली होती. या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देताना सिंधुदुर्ग येथील प्रधान जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालयाने आरोपी संतोष मधुकर लुडबे याला १५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आज २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. (Vengurla Prostitution Case Verdict)
या प्रकरणात आरोपी संतोष लुडबे हा अन्नपूर्णा सेक्स वर्कर फाउंडेशन या संस्थेच्या नावाखाली पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणत असे. त्यानंतर ग्राहकांना महिलांचा पुरवठा करून त्या बदल्यात मोबदला स्वीकारला जात होता. महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आरोपी स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संबंधित वेश्याव्यवसाय सुमारे पाच ते सहा वर्षांपासून सुरू असल्याची माहिती असून, या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची धडक कारवाई
पोलीस निरीक्षक अतुल माधवराव जाधव यांनी वेंगुर्ला तालुक्याचा कारभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणात धडक कारवाई केली होती. त्यांच्या कार्यकाळात वेश्याव्यवसायाविरोधात दोन कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यापैकी या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असलेल्या या गंभीर प्रकाराविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील अनैतिक व्यवसायांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले होते. या कारवाईबद्दल कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अतुल जाधव यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. आता या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावल्याने पोलिसांच्या तपासाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
विविध कलमांनुसार न्यायालयाने सुनावली शिक्षा
सिंधुदुर्ग येथील प्रधान जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी या खटल्यात आरोपीला भारतीय दंड संहिता, १८६० कलम ३७० नुसार १० वर्षे सश्रम कारावास, १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास सुनावला आहे. दंडाच्या रकमेतून ५० हजार रुपये पीडित महिलेला, तर ५० हजार रुपये शासनाकडे जमा करण्याचे नमूद आहे.
स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ कलम ३ नुसार १ वर्ष सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास. याच अधिनियमाचे कलम ४ नुसार १ वर्ष सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास. याच अधिनियमाचे कलम ५ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशा प्रकारे चारही कलमांखाली सुनावण्यात आलेल्या शिक्षांचा एकत्रित कालावधी नुसार एकूण १५ वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सात साक्षीदारांची न्यायालयात साक्ष
या खटल्यामध्ये अभियोग पक्षाकडून एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी पोलीस शिपाई अमर विष्णू कांडर, घटनास्थळ पंच स्मिता शंकर कोणेकर, पंच निकिता नितीन पोखरे, पीडित महिला, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश मधुकर वेंगुर्लेकर, बनावट ग्राहक अमित रमाकांत हाडये आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल माधवराव जाधव यांचा समावेश होता. या साक्षीदारांच्या साक्षी आणि तपासादरम्यान संकलित करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत
वेंगुर्ला तालुक्यात दीर्घकाळ सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता न्यायालयानेही आरोपीला शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कारवाईचे यापूर्वी कौतुक झाले होते.
आता या प्रकरणात शिक्षा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, प्रधान जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग यांनी हा निकाल सूनवला सरकारी अभियोक्ता ऍड संदीप अशोक राणे यांनी काम पाहिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








