LIVE UPDATES

कणकवलीत तब्‍बल पावणेदोन किलो गांजा जप्‍त

दोन संशयित ताब्‍यात : एलसीबीची कारवाई
Edited by:
Published on: August 13, 2026 19:49 PM
views 375  views

कणकवली : गांजा हा अंमली पदार्थ विक्रीच्‍या उद्‍देशाने बाळगलेल्‍या स्‍थितीत आढळल्‍याबाबत स्‍थानिक गुन्‍हा अन्‍वेषण शाखेच्‍या पथकाने (एलसीबी) दोन संशयितांना सापळा रचून ताब्‍यात घेतले. सूर्यकांत राघो घाडीगावकर (२९, रा. वागदे - देऊळवाडी) असे एका संशयिताचे नाव असून दुसरा संशयित अल्‍पवयीन आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्‍या नेतृत्‍वाखाली कणकवली शहरातील टेंबवाडी येथे एका सोसायटीनजीक गुरुवारी सायंकाळच्‍या सुमारास करण्‍यात आली. यात १,७९८ किलो ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा तसेच संशयितांनी वापरलेल्‍या दोन दुचाकी जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत.  

गांगो मंदिर ते गणपती साना जाणार्‍या डांबरी रस्त्यालगत टेंबवाडी येथील एका सोसायटीनजीक काही इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्‍याची माहिती एलसीबीच्‍या पथकाला गोपनिय सुत्रांकडून प्राप्‍त झाली. त्‍यानुसार पथकाने पीएसआय हाडळ यांच्‍या नेतृत्‍वाखाली सापळा रचला. सायंकाळच्‍या सुमारास तेथे दाखल दोन युवकांची पोलिसांनी चौकशी केली. त्‍यांच्‍याकडून विसंगत माहिती मिळाल्‍याने झडती घेतली असता प्‍लास्‍टीकच्‍या पिशवीत गांजा आढळून आला. गांजाची किंमत ६० हजार रुपये एवढी असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. सोबतच फसीनो व स्‍पलेंडर अशा दोन दुचाकी देखील जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्‍पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार व  एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहाय्‍यक पोलीस उपनिरीक्षक डॉमीनिक डिसोझा, हवालदार राजेंद्र गोसावी, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्सालवीस, पोलिस कॉन्स्टेबल समजिस्कर, कांडर आदी सहभागी झाले होते.