
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्री-प्रायमरी विभागात भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत सहभागी होत त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांनी उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय भावना आणि थोर व्यक्तींच्या कार्याविषयी आदराची भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत-भोसले, शाळेच्या उपप्राचार्या अवंतिका नाईक, शिक्षिका उमा झारापकर तसेच पालकवर्ग उपस्थित होता. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे अभिनंदन केले. चिमुकल्या पावलांतून देशभक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.










