LIVE UPDATES

पोलीस कर्मचाऱ्याच्या बंद घरात चोरांचा डल्ला

सावंतवाडी-देवसू येथील घटना : १४ हजारांहून अधिकचे साहित्य लंपास
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 19:43 PM
views 35  views

सावंतवाडी : तालुक्यातील देवसु मधलीवाडी येथे अज्ञाताने बंद घराची खिडकी आणि दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह तांबे, पितळ आणि चांदीच्या मौल्यवान साहित्यावर दरोडा टाकला आहे. या घरफोडीत एकूण १४ हजार ६०० रुपयांचे साहित्य चोरीला गेले असून या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ओरोस पोलीस कॉलनी येथे राहणारे मूळ देवसु मधलीवाडी येथील रहिवासी प्रदीप शांताराम नाईक (वय ५७) यांच्या बंद घरामध्ये ही घटना घडली. दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून प्रदीप नाईक यांच्या घर क्रमांक २०८ च्या पश्चिमेकडील खिडकीचे ग्रिल तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने घरातील बेडरूम, किचन आणि पडवीमध्ये ठेवलेली २०० रुपयांची रोख रक्कम, पितळी गॅस बर्नर, पितळी समई, परात, तांब्याची कळशी, तांब्या, मोठा हंडा, तामण, कलश, तांब्याची पळी, फुलपात्र, स्टील आणि जर्मन धातूचे टोप तसेच १५०० रुपये किमतीचा चांदीचा करंडा असा एकूण १४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबवला.

याशिवाय चोरट्याने शेजारीच असलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या घर क्रमांक २०७ चा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत तेथूनही साहित्याची चोरी केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रदीप नाईक यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी रात्री ८:३१ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सावंतवाडी पोलीस संशयित आरोपींचा कसून शोध घेत आहेत.