LIVE UPDATES

दांडी येथे वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटनांमुळे नागरिक आक्रमक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 13, 2026 20:37 PM
views 29  views

मालवण : मालवण दांडी येथील झालझुल वाडीतील वीज पोलावरील वीज वाहिन्या तुटून पडल्याने एक युवक बालबाल बचावल्याची घटना आज सायंकाळी घडली. या भागात वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून त्याबाबत वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने दांडी येथील स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून १४ रोजी वीज कार्यालयावर धडक देण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

दांडी झालझुल वाडी येथे दोन दिवसापूर्वी वीज वाहिनी तुटून पडल्याची घटना घडल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी वीज वाहिनी पुन्हा जोडली होती. मात्र, आज सायंकाळी पुन्हा वीज वाहिनी तुटून खाली पडली. त्यावेळी तेथून जाणारा एक युवक वीज वाहिनी अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आक्रमक बनले आहेत. यावेळी स्थानिक नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी जगदीश खराडे, संदीप मालंडकर, नारायण धुरी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

झालझुलवाडी, श्रीकृष्णवाडीसह दांडी परिसरातील किनारी भागातील वीज वाहिन्या या जीर्ण बनल्या असून त्या बदलण्यासाठी गेले दोन वर्षे मागणी करण्यात येत आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून किनारी भागात घरे, मच्छिमारी होड्या, मासेमारी साहित्य असल्याने त्यावर वीज वाहिनी कोसळून मोठे नुकसान होऊ शकते. तसेच नागरिकांचा वावर असल्याने जीवितहानी देखील होऊ शकते. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊन देखील वीज कंपनी लक्ष देत नसल्याने याबाबत जाब विचारण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी मालवण वीज कार्यालयावर धडक देण्यात येईल, असा इशारा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिला.