
वैभववाडी : 'लकी ड्रॉ'च्या माध्यमातून महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना खांबाळे ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, त्यांच्यासोबत आणखी दोघे असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खांबाळे येथे आज सकाळी नऊच्या सुमारास दोन महिला व एक पुरुष चारचाकी वाहनातून आले होते. लकी ड्रॉच्या कुपनच्या माध्यमातून गॅस शेगडी, टीव्ही, फ्रीज यांसह विविध गृहपयोगी वस्तू देण्याचे आमिष नागरिकांना दाखविले जात होते. दोन्ही महिला गावातील घरांमध्ये जाऊन नागरिकांना योजनेची माहिती देत होत्या.
दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांत कोकिसरे व एडगाव येथे याच पद्धतीने नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती ग्रामस्थांना होती. त्यामुळे काही तरुणांनी संबंधितांचा शोध घेतला. तरुण येत असल्याचे लक्षात येताच तिघांनी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिष्टी मंदिर परिसरात ग्रामस्थांनी त्यांना थांबविले. संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिघांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. कोकिसरे येथील दोन नागरिकांना टीव्ही देण्याचे आमिष दाखवून सुमारे ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधित तिघे कोल्हापूर येथील असल्याचे समजते. या प्रकरणाशी संबंधित आणखी दोघे संशयित सायंकाळी उशिरा पोलिसांत हजर झाले होते. पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली.














