
दोडामार्ग : तिलारी घाटातील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात साटेली भेडशी येथील अखिल जोस आणि बेंतु फर्नांडिस हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यापैकी अखिल जोस याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बेंतु फर्नांडिस याच्यावर बांबोळी (गोवा) येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, साटेली भेडशी येथील बेंतु फर्नांडिस आणि अखिल जोस हे दोघे कामानिमित्त बेळगाव येथे गेले होते. तेथून शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीने आपल्या गावी परतत असताना तिलारी घाटातील वळणावर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. याचवेळी त्यांच्या मागून कोल्हापूर आगाराची कोल्हापूर-दोडामार्ग एसटी बस येत होती. अपघाताचे गांभीर्य लक्षात येताच बसचालक श्रीकांत पाटील आणि वाहक सागर मुदगी यांनी प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबवली.
बसमधील प्रवाशांच्या मदतीने दोन्ही जखमींना बसमध्ये घेऊन साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टर आणि परिचारिकांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अखिल जोस याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान निधन झाले.
बसमधील पाच नर्सिंग विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान
या एसटी बसमधून साटेली भेडशी येथील कोल्हापूरमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थिनी प्रवास करत होत्या. अपघातानंतर त्यांनी आपले प्रशिक्षण आणि ज्ञानाचा उपयोग करत जखमींना तातडीने प्राथमिक उपचार दिले. लावण्या डांगी, समीक्षा डांगी, निकिता यादव, श्रुती पाटील आणि प्राची चांदेकर या पाच विद्यार्थिनींनी जखमींवर प्रथमोपचार केले.
एसटी चालक-वाहकांच्या माणुसकीचे कौतुक
अपघात घडताच बस थांबवून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडणारे चालक श्रीकांत पाटील आणि वाहक सागर मुदगी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








