
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेचे वेळापत्रक शनिवारी पूर्णपणे विस्कळीत झाल्याने मुंबईहून सिंधुदुर्गात येणाऱ्या तसेच सिंधुदुर्गातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. विविध रेल्वेगाड्या दोन ते तब्बल दहा तास उशिराने धावत असल्याने सावंतवाडी रेल्वे स्थानकासह मार्गावरील स्थानकांमध्ये प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस, जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्यांच्या विलंबामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली.मडगावहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये मडगावच्या पुढे माजोर्डा येथे बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मडगावच्या दिशेने येणारी १११०० क्रमांकाची एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस तब्बल नऊ ते दहा तास उशिराने धावली. रात्री ११.३० वाजता सुटणारी ही गाडी प्रत्यक्षात पहाटे चार वाजता रवाना झाली. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागला. सावंतवाडी रेल्वे स्थानकात ही गाडी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल नऊ ते दहा तास उशिराने गाडी दाखल झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन कोलमडले.
दरम्यान, मडगावहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये मडगावच्या पुढे माजोर्डा येथे बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दुपारी साडेचार वाजता मडगावहून सुटलेली जनशताब्दी तब्बल तीन ते चार तास विलंबाने धावत होती. ही गाडी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी स्थानकात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. इंजिनमधील बिघाडामुळे अन्य रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
मुंबईहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी कोकणकन्या एक्स्प्रेसदेखील तब्बल पाच तास उशिराने धावली. त्याचबरोबर सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेने रात्री ८.३६ वाजता सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसलाही विलंबाचा फटका बसला. ही गाडी रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी स्थानकात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसचा नऊ ते दहा तासांचा विलंब, जनशताब्दीच्या इंजिनमधील बिघाड आणि कोकणकन्या एक्स्प्रेसच्या उशिराने धावण्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. रेल्वे स्थानकांवर ताटकळत बसलेल्या प्रवाशांना प्रवासाच्या नियोजनात बदल करावे लागले, तर काही प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ आली. रेल्वेगाड्यांच्या सततच्या विलंबामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, कोकण रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








