
सोलन : मंदिरात गेल्यावर देवाच्या चरणी फुले, नारळ, पेढे किंवा अगरबत्ती वाहणं हे आपल्यासाठी अगदी नेहमीचं आहे. पण आपल्याच भारतात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे देवांना अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तू पाहून कोणाचेही डोळे विस्फारतील. कुठे देवाला चक्क दारूच्या बाटल्या वाहिल्या जातात तर कुठे देवाला पेटती सिगारेट किंवा बिडी ओढायला दिली जाते. या विचित्र वाटणाऱ्या प्रथांमागे रंजक कथा आणि भक्तांची अफाट श्रद्धा आहे.
सध्या सोशल मीडियावर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात असलेल्या 'लुटरू महादेव' मंदिराची जोरदार चर्चा रंगली आहे. अर्कीजवळील एका डोंगरावर असलेल्या नैसर्गिक गुहेत हे प्राचीन शिवमंदिर आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाने घडवलेलं शिवलिंग. यावर अनेक लहान-लहान छिद्रे आहेत. भाविक या छिद्रांमध्ये पेटत्या बिड्या किंवा सिगारेट खोचतात आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या बाजूच्या छिद्रातून धूर बाहेर येताना दिसतो. हे पाहून खुद्द भगवान शंकरच ही सिगारेट ओढत आहेत, अशी भक्तांची पक्की श्रद्धा आहे.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, गुहेतील नैसर्गिक हवेच्या प्रवाहामुळे सिगारेट विझत नाही. पण भक्तांसाठी हा त्यांच्या श्रद्धेचा आणि इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग आहे. स्थानिकांच्या मते, १६२१ मध्ये बाघल संस्थानाच्या राजाने स्वप्नातील आदेशानुसार हे मंदिर बांधलं.
सिगारेटच नाही, तर भारतात अशीही मंदिरं आहेत जिथे देवाला मद्य अर्पण केलं जातं. यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे मध्य प्रदेशातील उज्जैनचं 'श्री कालभैरव मंदिर'. इथे भाविक देवाला विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या अर्पण करतात. पुजारी थोडी दारू छोट्या भांड्यात घेऊन ती कालभैरवाच्या मूर्तीच्या तोंडाजवळ धरतात आणि उरलेली दारू भक्तांना 'प्रसाद' म्हणून परत दिली जाते.
संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








