LIVE UPDATES

Sindhudurg Crime : बसस्टॅंडवरील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पती-पत्नी जेरबंद
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 06, 2026 06:37 PM
views 296  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : बसस्थानक परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या संशयित पती-पत्नीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कणकवली येथे सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. दीपक संतोष सकट (वय २७) आणि अमृता दीपक सकट (वय २१, दोन्ही रा. एस. एम. हायस्कूलमागे, किन्ई, कणकवली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये २१ सप्टेंबर २०२६ रोजी सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर चोरी दीपक सकट व अमृता सकट यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने आज  कणकवली तालुक्यातील गडनदीजवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, चोरी केलेले १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी कर्नाटकात लपवून ठेवल्याची माहिती दिली आहे.

आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला हवालदार रुपाली खानोलकर, हवालदार जॅकसन घोन्सलवीस आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.