LIVE UPDATES

उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’

शेवरे, ओंबळ ते किंजवडेपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासाची राज्यस्तरावर दखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 08:37 PM
views 39  views

देवगड : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देत नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि समाजसहभागातून शाळा विकासाचा ध्यास घेणारे देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथील उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव राजाराम जाधव यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर झालेल्या ‘आयडॉल शिक्षक सन्मान २०२६–२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतल्याने किंजवडे शाळेसह देवगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

श्री. जाधव यांनी आपल्या शिक्षक सेवेची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवरे येथून केली. तेथे त्यांनी जवळपास १० वर्षे सेवा बजावली. त्यानंतर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओंबळ गावठण बौद्धवाडी येथे सुमारे १० वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान दिले. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथे कार्यरत आहेत. आपल्या प्रत्येक सेवास्थानी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

नाविन्यपूर्ण अध्यापन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. डिजिटल अध्यापन, वाचन-लेखन अभियान, गणितीय कौशल्य विकास, कृतीप्रधान शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कला-क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अध्ययन प्रक्रिया आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

शाळेच्या भौतिक सुविधांची पूर्तता, शैक्षणिक उठावातून शाळा विकास, परिसर सुशोभीकरण आणि अध्ययनपूरक वातावरण निर्मिती यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून शाळेच्या विकासाला लोकसहभागाची जोड दिली.

शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. पालकांशी सातत्यपूर्ण संपर्क, समाजातील विविध घटकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

शिक्षणातील गुणवत्ता, नवोपक्रमशीलता, तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थी विकास आणि सामाजिक बांधिलकी या कार्याचा गौरव म्हणजेच त्यांना मिळालेला ‘आयडॉल शिक्षक सन्मान’ होय.

त्यांच्या या निवडीबद्दल किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी आवर्जून शिक्षण परिषदेत शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून यथोच्च सत्कार केले. शिक्षण विभागातील अधिकारी,केंद्रसमन्वयक चिदानंद कोळी,केंद्रमुख्याध्यापक परमेश्वर जाधवर,पदवीधर शिक्षक विवेक कुळकर्णी, सहशिक्षक महेश इंगोले, सेवाजेष्ठ शिक्षक हरिदास खेडकर, सर्व आरे केंद्रातील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान केवळ एका शिक्षकाचा नसून शाळा, विद्यार्थी आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.