LIVE UPDATES

Rare Orange Painted Bat in Maharashtra : वेंगुर्ला येथे आढळले दुर्मिळ भगव्या रंगाचे वटवाघूळ

सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांनी सुरक्षित सोडले नैसर्गिक अधिवासात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 06:54 PM
views 259  views
Rare orange Painted Bat spotted and rescued in Vengurla, Sindhudurg, Maharashtra.

​वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील खर्डेकर कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या ॲड. प्रकाश बोलेकर यांच्या घरी एक वेगळ्याच प्रकारचा जीव दिसून आला. याला सुरुवातीला अनेकांनी फुलपाखरू समजले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीनंतर ते एक अत्यंत दुर्मिळ प्रजातीचे भगव्या रंगाचे वटवाघूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

श्री. बोलेकर यांच्या घरी हा अनोखा जीव आढळल्यानंतर त्यांनी तातडीने 'वाईल्ड लाईफ रेस्क्यू सिंधुदुर्ग' टीमशी संपर्क साधून आडेली गावचे अभ्यासू सर्पमित्र दीपक शशिकांत दुतोंडकर यांना बोलावून घेतले. माहिती मिळताच सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या जीवाची पाहणी केली असता, तो फुलपाखरू नसून एक दुर्मिळ भगव्या रंगाचे वटवाघूळ असल्याचे स्पष्ट झाले.  

या वटवाघळाला ​पेटेंड बॅट असे म्हणतात. अशा प्रकारची वटवाघळे ही त्यांच्या आकर्षक भगव्या रंगामुळे आणि मऊ केसांमुळे अत्यंत सुंदर दिसतात. निसर्गामध्ये हा भगवा रंग त्यांना संरक्षणासाठी मदत करतो. कारण केळीच्या सुकलेल्या पानांमध्ये किंवा वाळलेल्या झाडांच्या पानांमध्ये विश्रांती घेत असताना या रंगामुळे ती शत्रू प्राण्यांपासून (उदा. पक्षी किंवा साप) सहजासहजी लपून राहतात. ही प्रजाती सध्या खूप दुर्मिळ होत चालली असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशी वटवाघळे महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळतात. 

सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांनी कोणतीही हानी न पोहोचवता या दुर्मिळ वटवाघळाला अत्यंत सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच सुरक्षित ठिकाणी सुखरूप सोडले. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.