
देवगड : मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडणाऱ्या तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर देवगड पोलिसांनी गुरुवारी दंडात्मक कारवाई केली. या विशेष मोहिमेत सहा वाहनधारकांवर एकूण ९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
देवगड-विठ्ठलवाडी परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा सुरू असते. मासळी ताजी राहावी यासाठी या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फाचा वापर केला जातो. मात्र, बर्फ वितळल्यानंतर तयार होणारे दुर्गंधीयुक्त पाणी काही वाहनचालकांकडून थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत होती. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच रस्त्यावर साचणाऱ्या या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यापूर्वी अशा प्रकारांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत स्थानिक ग्रामस्थांनी देवगड तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. देवगडसारख्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने सार्वजनिक स्वच्छता, नागरिकांचे आरोग्य आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान, या तक्रारींच्या अनुषंगाने मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी मासळी वाहतूक करणाऱ्या संबंधित वाहनधारकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. वाहतुकीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.
यानंतर देवगड पोलिसांनी गुरुवारी विशेष मोहीम राबवत वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. या मोहिमेत सहा वाहनधारकांना एकूण ९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई देवगड पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी केली.
यापुढेही अशा प्रकारच्या मोहिमा सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे देवगड पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मासळी वाहतूकदारांनी वाहनांमधील दूषित पाणी रस्त्यावर सोडू नये आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








