
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या २०२४ मधील शासन आदेशानुसार पात्र नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी राबविण्यात आलेल्या संसारोपयोगी भांडी संच वाटप योजनेचा लाभ मालवण तालुक्यातील २०५ घरेलू कामगारांना मिळाला आहे. भारतीय मजदूर संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यापूर्वी लाभापासून वंचित राहिलेल्या ९१६ पात्र घरेलू कामगारांचा प्रश्न मार्गी लागला असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भांडी संचांचे वाटप करण्यात आल्याने लाभार्थी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
महाराष्ट्र शासनाच्या २०२४ मधील आदेशानुसार राज्यातील पात्र नोंदणीकृत घरेलू कामगारांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी संसारोपयोगी भांडी संचांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ जुलै २०२४ पूर्वी नोंदणीकृत असलेले ९१६ पात्र घरेलू कामगार या लाभापासून वंचित राहिले होते. त्यामुळे या कामगारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय मजदूर संघाने शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रश्नाकडे कामगार मंत्री आकाश फुंडकर, खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शासनस्तरावर करण्यात आलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांसाठी संसारोपयोगी भांडी संच मंजूर करून घेण्यात भारतीय मजदूर संघाला यश आले.
या निर्णयानुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात कार्यरत घरेलू कामगारांना भांडी संचांचे वाटप करण्यात आले. यामध्ये मालवण तालुक्यातील २०५ पात्र घरेलू कामगारांचा समावेश असून, शासनाच्या या उपक्रमामुळे कामगार कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचा लाभ मिळाला आहे. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात घरेलू कामगारांना भांडी संच वितरित करण्यात आले.
असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगारांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून, त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी दिली.
या भांडी संच वाटपप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत, मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालविकास सभापती अन्वेशा आचरेकर, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, मेघा सावंत, पुजा खराडकर, सौ. प्रभाळे, गणेश परब यांची उपस्थिती होती.
भारतीय मजदूर संघाच्या पाठपुराव्यामुळे दीर्घकाळ लाभापासून वंचित राहिलेल्या घरेलू कामगारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाल्याने कामगारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव तथा बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण, भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा सीमा धुरी, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, सहसचिव शुभांगी सावंत, निनाद बादेकर, शुभम लुडबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all









