
कुडाळ : पिंगुळी येथील पाझर तलावाच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक समस्यांच्या निवारणासाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक पत्रानंतर मागे घेण्यात आले आहे. कुडाळचे प्रभारी प्रांत अधिकारी सचिन पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य गुरु (गंगाराम) सडवेलकर यांनी उपोषणाची यशस्वी सांगता केली.
पिंगुळी (ता. कुडाळ) येथील पाझर तलावालगत सुरू असलेल्या विकास कामांमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. पाझर तलावाचा प्रश्न, पाण्याचे प्रदूषण, वहिवाटीचे रस्ते आणि तलाव वाचवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने २१ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर २०२६ रोजी निवेदने देण्यात आली होती. यावर तातडीने तोडगा निघावा म्हणून जि. प. सदस्य गुरु सडवेलकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सलग चार दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता.
प्रशासनाकडून विकासकामे स्थगित करण्याचे आदेश
अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेत ६ नोव्हेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ, सचिन पाटील यांनी अधिकृत पत्र (क्र. जबाबी/देऊळवाडी-पिंगुळी/पाझर तलाव/११/२०२६) जारी केले. या पत्राद्वारे संबंधित विकासकांना ( ओरिजीन कुडाळ, एल.एल.पी.) खालील स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत:
रस्ते खुले करणे: स्थानिक शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यांना अटकाव करू नये; तसे असल्यास सदर रस्ते तात्काळ खुले करण्यात यावेत.
पाण्याचे प्रदूषण रोखणे: पाझर तलावातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ते कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
पाण्याचे स्रोत सुरक्षीत ठेवणे: लगतचे सार्वजनिक पाण्याचे स्रोत आटणार नाहीत किंवा त्यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
कामांना स्थगिती: या सर्व मुद्द्यांवर उचित कार्यवाही होईपर्यंत सदर मिळकतीमध्ये सुरू असलेली सर्व बांधकामे तात्काळ स्थगित ठेवण्यात यावीत.
दिवाळी सण आणि परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषण सोडण्याच्या वेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार जी. जी. उपरकर, धीरज परब, अभय शिरसाट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पिंगुळी देऊळवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनामुळे उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, दिलेल्या पत्रातील नियमांनुसार पाझर तलाव आणि ग्रामस्थांच्या हक्कांचे काम लवकरात लवकर व पारदर्शकपणे मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








