LIVE UPDATES

देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा

फ्रेंडस् सर्कलतर्फे खुल्या व मिनी गटात आयोजन; विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 06, 2026 08:32 PM
views 38  views

देवगड : फ्रेंडस् सर्कल देवगड सडा यांच्या वतीने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता फ्रेंडस् सर्कल नाका, देवगड येथे भव्य नरकासूर स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या स्पर्धेत खुला गट आणि मिनी नरकासूर अशा दोन गटांत स्पर्धा रंगणार आहे.

खुल्या गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाला १२ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ८ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ४ हजार रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. मिनी नरकासूर गटात प्रथम क्रमांकासाठी १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट प्रवेशासाठी (बेस्ट एन्ट्री) १ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी खुल्या गटातील नरकासूराची उंची कमाल १२ फूट, तर मिनी नरकासूराची उंची ३ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. खुल्या गटातील चलचित्र नरकासूराची उंची स्पर्धास्थळी पोहोचल्यानंतर वाढविण्याची मुभा देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांनी आपले नरकासूर रात्री १० वाजेपर्यंत स्पर्धास्थळी आणणे बंधनकारक आहे. त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांचे १० गुण कमी करण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला किंवा मंडळाला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. तसेच स्पर्धास्थळी नरकासूर दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी ५ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी आदेश बांदेकर (७२६२०११७०८) व चरण काटोकर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धक मंडळांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन फ्रेंडस् सर्कल मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.