LIVE UPDATES

घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 19:13 PM
views 36  views

राजापूर : घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, यासाठी तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून लांजा तालुक्यातील कुवे येथील २७ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतीसह सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मयत शुभ्रा यादव हिचा १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ऋषीकेश प्रकाश यादव (रा.कुवे वारीशेवाडी, ता.लांजा) याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून तिच्याकडे तगादा लावला जात होता. या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून शुभ्रा हिने ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुवे वारीशेवाडी येथील राहत्या घरातील बेडरूममध्ये साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. त्यावेळेस तिला उपचारासाठी प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ७ ऑक्टोबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी शुभ्रा हिची बहीण तृप्ती भालचंद्र माजळकर (वय ३२, रा. गोंडेसखल रोड, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित शुभ्राचा पती ऋषीकेश यादव, सासरे प्रकाश केशव यादव (वय ६७), सासू सुवर्णा प्रकाश यादव (वय ५५) आणि दीर अनमोल प्रकाश यादव (वय २५) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करत आहेत.