LIVE UPDATES

Mumbai-Goa Highway Accident : ओणी येथे मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक

दुचाकी १५ ते २० मीटर फरफटत नेली; कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 19:21 PM
views 121  views
Swift car and Activa scooter involved in an accident on the Mumbai-Goa Highway near Rajapur

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील ओणी नजीक गगनगिरी महाराज आश्रमाजवळ भरधाव स्विफ्ट कारने पुढे जाणाऱ्या एक्टिव्हा दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खरवते गावच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार शुभम आत्माराम बोरकर (वय २७, रा. चिंचखरी, ता. रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले. धडकेनंतर दुचाकी सुमारे १५ ते २० मीटर फरफटत गेली आणि कारच्या पुढील भागाखाली अडकली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी संशयित कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

शुभम बोरकर हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृहकर्ज विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी ते बँकेच्या कामानिमित्त आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीने (क्र. एमएच ०८ एएम ४२२४) राजापूर शाखेतील काम आटोपून लांजा शाखेकडे निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास ते मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना खरवते गावच्या हद्दीत गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (क्र. एमएच ०८ बीई ३४६९) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, बोरकर हे दुचाकीवरून उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात जाऊन पडले. त्यानंतर कारने दुचाकीला सुमारे १५ ते २० मीटर फरफटत नेले आणि महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीवर धडक दिली. या अपघातात दुचाकी कारच्या पुढील भागाखाली अडकून अक्षरशः चेपली गेली.

नागरिकांची घटनास्थळी धाव

अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसह स्थानिक नागरिक प्रज्योत खानविलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी बोरकर यांना मदत केली. नागरिकांनी कारचालकालाही वाहनातून बाहेर काढले. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आणि त्याला व्यवस्थित बोलताही येत नसल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. आर्यन किशोर ढबले (वय २४, रा. वॉर्ड क्रमांक १, वायफड, जि. वर्धा) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. त्याने ही कार रत्नागिरी येथून भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेथ ॲनालायझर तपासणीत अहवाल पॉझिटिव्ह

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शुभम बोरकर यांना तातडीने राजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित चालक आर्यन ढबले याची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी शुभम बोरकर यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख करीत आहेत.