
ठाणे : आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असलेल्या आणि अत्यंत मौल्यवान मानल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या वांतीची (Ambergris) बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ च्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत आरोपींकडून २ किलो ७२० ग्रॅम वजनाचे अॅम्बरग्रीस जप्त करण्यात आले असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २ कोटी ७२ लाख रुपये इतकी आहे.
सापळा रचून जांभळी नाका परिसरात कारवाई
गुन्हे शाखा, घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश बडगुजर यांना खबऱ्यांमार्फत या तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या बातमीच्या आधारे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:५० वाजताच्या सुमारास ठाणे (पश्चिम) येथील जांभळी नाका परिसरातील हायलॅन्ड रेसिडेन्सी लॉजजवळ गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.
संशयित हालचालींवरून पोलिसांनी मयुर विश्वास पाटील (रा. कोल्हापूर) आणि मिनाक्षी मधुकर मोहीते (रा. सिंधुदुर्ग) या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे २.७२० किलो वजनाची व्हेल माशाची वांती/उलटी (Ambergris) आढळून आली.
उच्च दर्जाच्या सुगंधित द्रव्यांसाठी वापर
अॅम्बरग्रीसचा वापर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाची अत्तरे, परफ्युम्स आणि इतर सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात याला प्रचंड सोन्यासारखी किंमत मिळते. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत तब्बल २ कोटी ७२ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने अॅम्बरग्रीस ताब्यात बाळगल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गु. र. क्र. २९२/२०२६ नुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९ (ब), ५७, ५१ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक-१ चे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे करत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी
ही कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) शेखर बागडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोउपनि सुभाष मोरे, पोहवा गणेश बडगुजर, व्यंकट धायगोडे, शेखर तडवी, दिपाली जाधव, सपोनि चित्रा चौधरी, पोउपनि प्रकाश शिरसाठ, श्रेणी पोउपनि दीपक जाधव, सपोउपनि उज्ज्वला कुबल, सुनील माने, पोहवा अविनाश पाटील, नागराज सोनकडे, शब्बीर फरास, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, मुकुंद आव्हाड, मपोहवा मलिका बहिरम, पो.ना. निशिकांत पाटील, पोलीस अंमलदार मयूर लोखंडे, सागर सुरळकर आणि चापोहवा शशिकांत सावंत यांच्या पथकाने केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










