LIVE UPDATES

१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांसाठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2026 : १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण झालेले किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखेत डिप्लोमा असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाली आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 16:48 PM
views 75  views
Indian Coast Guard Recruitment 2026 for 10th and 12th pass candidates

मुंबई : जर तुम्ही १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असाल आणि इंडियन कोस्ट गार्डमध्ये (Indian Coast Guard) नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कोस्ट गार्डने 'कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सनल टेस्ट' २०२६ अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक आणि हायजिनिस्ट-I या पदांच्या एकूण ३६५ जागा भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत.

१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण झालेले किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखेत डिप्लोमा असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार २१ हजार ७०० रुपये ते २९ हजार २०० रुपयांदरम्यान वेतन मिळेल.

इंडियन कोस्ट गार्डच्या या भरतीप्रक्रियेद्वारे विविध पदांच्या एकूण ३६५ जागांवर भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक आणि हायजिनिस्ट-I या पदांचा समावेश आहे. पदनिहाय रिक्त जागांबाबतच्या माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना पहावी.

पदांसाठी शैक्षणिक पात्रता

नाविक (जनरल ड्युटी) या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Mathematics) हे विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण केलेली असावी. नाविक (डोमेस्टिक ब्रँच) या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण केलेली असावी.

यांत्रिक पदासाठी उमेदवारांनी १० वी उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा असावा. हायजिनिस्ट I या पदासाठी १० वी उत्तीर्ण झालेले किंवा समकक्ष आयटीआय पात्रता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

पदांसाठी वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २२ वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, संबंधित पदांसाठी लागू असलेले जन्मतारखेचे निकष विचारात घेतले जातील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाऊ शकते. अर्ज करण्यापूर्वी विशिष्ट पदांसाठी विहित केलेले वयोमर्यादेचे निकष तपासणे आवश्यक आहे.

वेतन किती असेल?

इंडियन कोस्ट गार्डमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदावर आधारित वेतन मिळेल. यामध्ये नाविक (जनरल ड्युटी/डोमेस्टिक ब्रँच) आणि हायजिनिस्ट-I पदासाठी पे लेव्हल-३ अंतर्गत २१ हजार ७०० रुपये प्रति महिना मूळ वेतन देण्यात येईल. तर यांत्रिक पदासाठी पे लेव्हल ५ अंतर्गत २९ हजार २०० रुपये प्रति महिना मूळ वेतन देण्यात येईल.

अर्जाचे शुल्क किती आहे?

उमेदवारांना अर्ज भरताना सामान्य (General), इतर मागास वर्ग (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना ५५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

पदांसाठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार इंडियन कोस्ट गार्डच्या अधिकृत भरती पोर्टलद्वारे (https://indiancoastguard.gov.in/recruitment) ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक क्षमता निकष आणि इतर पात्रता निकषांबाबतची भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर केल्यानंतर, उमेदवारांनी अर्जाची प्रत स्वतःकडे ठेवावी.

भरतीची निवड प्रक्रिया

या भरती प्रक्रियेची निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडेल. यातील पहिला टप्प्यामध्ये उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा होणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, मूल्यांकन/अनुकूलता चाचणी (Adaptability Test) आणि प्राथमिक कागदपत्र पडताळणी पार पडणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांची आयएनएस चिल्का येथे अंतिम कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.