LIVE UPDATES

मालवणमध्ये रंगणार ‘बीच लोककला महोत्सव’

१० व ११ ऑक्टोबर रोजी मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे स्थानिक लोककला पथकांचे सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 20:23 PM
views 48  views

मालवण : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव देणारा ‘बीच लोककला महोत्सव’ शनिवार, दि. १० आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मालवण बंदर जेटी वाहनतळ, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

या महोत्सवात स्थानिक लोककला पथकांचा सहभाग असणार असून, त्यांच्या सादरीकरणातून कोकणच्या लोकसंस्कृतीतील विविध कलाप्रकार आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवामुळे स्थानिक लोककलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, नागरिक आणि पर्यटकांना लोककलेचा आनंद घेता येणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, नागरिकांनी तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक लोककलांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.