LIVE UPDATES

नेरूरपार जेटी येथे अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल विभागाचा छापा

३ होड्या नदीपात्रात बुडविल्या, २ प्रवाहात सोडल्या
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 19:43 PM
views 51  views

कुडाळ : कर्ली नदीपात्रातील अनधिकृत वाळू उपशाविरोधात महसूल विभागाने गुरुवारी (८ ऑक्टोबर) मोठी कारवाई करत वाळू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहे. कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यादरम्यान वाळूने भरलेल्या एकूण ५ होड्या जप्त करण्यात आल्या. यातील ३ होड्या महसूल पथकाने नदीपात्रातच बुडविल्या, तर २ होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या.

उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे धडक काम पार पडले. नेरूरपार जेटी आणि लगतच्या नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच महसूलच्या पथकाने परिसरात अचानक पाहणी केली. त्यावेळी प्रत्यक्ष नदीपात्रात ५ होड्या वाळू वाहतूक करताना रंगेहाथ आढळून आल्या.

या संयुक्त कारवाईत कुडाळ व पिंगुळीचे मंडळ अधिकारी, कुटगाव, नेरूर, चेंदवण आणि वालावलचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) तसेच संबंधित महसुली क्षेत्रातील पोलिस पाटील सहभागी झाले होते.

शासकीय नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खननाला आणि वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महसूल विभाग आता अधिक आक्रमक झाला आहे. यापुढेही अशा प्रकारची नियमित तपासणी व कारवाई सत्र सुरूच राहणार असून, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.