
सावंतवाडी : नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात कोणताही अपहार झालेला नसताना शिवसेनेच्या नगरसेवकाकडून चुकीची माहिती देण्यात येत आहे. यातून पालिकेची बदनामी होत आहे. आम्ही पाणीपुरवठा विभागातील काही गोष्टी लक्षात येताच त्या विभागातील बिले रोखली आहेत. आता थर्डपार्टी ऑडिटद्वारे या विभागातील प्रशासक काळापूर्वी आणि प्रशासकीय काळातील सर्व रेकॉर्ड तपासले जाणार असल्याचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितले. तर माझी सही आहे असा आरोप करण्याऱ्यांनी अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नये असाही टोला हाणला. आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, अपहाराचे आरोप झाल्यामुळे आणि यातून पक्षाची बदनामी होत असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार सभापती प्रतीक बांदेकर यांचा तात्पुरता राजीनामा घेण्यात आला आहे. ते पूर्णपणे निर्दोष असून त्यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी अर्धवट माहितीच्या आधारे शहर आणि पालिकेला बदनाम करत आहेत.
नागरिकांनी त्यांच्या आरोपांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर सहिचे होणारे आरोप सुद्धा शिवसेनेच्या नगरसेवकांकडून चुकीचे होत आहेत. पाणीपुरवठा विभागातील काही गोष्टी लक्षात घेता त्या विभागाशी संबंधित बिले तात्काळ रोखली आहे. त्यामुळे आमच्यावर होणारे आरोप हे चुकीचे आहेत.
आजच्या बैठकीत काही गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या समोर आल्यात. त्या संदर्भात सखोल चौकशी केली जाणार आहे. तर दुसरीकडे मुख्याधिकारी यांची बदली करण्यात यावी अशी मागणी आम्ही पालकमंत्र्यांकडे केली आहे. लवकरच आम्हाला या ठिकाणी नव्याने मुख्याधिकारी मिळेल अशी आशा आहे.
दरम्यान, विस्थापित करण्यात आलेल्या स्टॉलधारकांना लवकरच योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली. शहरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, प्रशासकीय काळात अखर्चित राहिलेला तब्बल नाव कोटीचा निधी पुन्हा शासनाकडे परत गेला आहे. तो पुन्हा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तर इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या बाबत आम्ही माहिती मागवली असून त्यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.










