
वैभववाडी : सांगुळवाडी येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारा कालीचरण संभाजी वाघमोडे (मूळ रा. माळशिरस, सोलापूर) याला बुधवारी (ता. ७) रात्री दहाच्या सुमारास सचिन करकोटे याने मारहाण केली. या मारहाणीत कालीचरणच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी सचिन करकोटे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कालीचरण वाघमोडे हा सांगुळवाडी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, वैभववाडी बाजारपेठेत राहतो. बुधवारी रात्री खानावळीत जेवण केल्यानंतर तो मित्रासोबत दत्तमंदिराजवळील रस्त्यावरून जात होता. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या सचिन करकोटे याने कालीचरणच्या मित्राला आवाज देऊन जवळ बोलावून घेतले. त्याच्याशी कोणत्यातरी कारणावरून दमदाटी सुरू केली.
हा प्रकार पाहून कालीचरण तेथे गेला आणि करकोटे याच्याकडे मित्राला दमदाटी करण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी करकोटे याने शिवीगाळ करत हातातील कुलूप कालीचरणच्या कानावर मारले. या घटनेत त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली. जखमी कालीचरणला उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सचिन करकोटे याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










