
चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी हनुमानवाडी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातील मोलकरीण व तिच्या साथीदाराने मिळून सुमारे ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुयोग बेलवलकर (वय ३०, रा. कळमुंडी, हनुमानवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीनुसार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ५ ते दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०४ या कालावधीत अज्ञातपणे घर बंद असताना आरोपींनी घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी मोलकरीण संशयित दिपीका बोबले (४०, रा. आवेरीवाडी, कळमुंडी) तसेच संशयित गणेश गोरीवले (३१, रा. कळमुंडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या ऐवजात मंगळसूत्र, कानातील दागिने, सोन्याची चेन, ब्रेसलेट, पेंडंट, अंगठ्या, सोन्याची नाणी, नथ, सोन्याचे मणी तसेच १८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.














