LIVE UPDATES

आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर मनसेचा हल्लाबोल

8 दिवसांत सुधारणा न झाल्यास १५ ऑगस्टला घंटानाद आंदोलनाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 03, 2026 16:29 PM
views 28  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य सेवांमध्ये असलेल्या विविध त्रुटींमुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (३ ऑगस्ट) मनसेच्या शिष्टमंडळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच येत्या आठ दिवसांत आरोग्य व्यवस्थेत ठोस सुधारणा न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

मनसेने दिलेल्या निवेदनात जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्यातील समन्वयाचा अभाव, डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ (टेक्निशियन) व इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर असलेली रिक्त पदे, अनेक वॉर्ड बंद असल्याची स्थिती आणि त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे दुर्गम भागातील नागरिकांना खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत असून त्यातून गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचा आरोपही करण्यात आला.

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात अनेक महिन्यांपासून प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे मनसेने नमूद केले आहे. परिणामी अनेक महिलांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कायमस्वरूपी प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये डॉक्टर, औषधे व आवश्यक वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागत असल्याचाही मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. तसेच ओरोस येथील शासकीय रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर रुग्णांना गोव्यातील बांबोळी रुग्णालयात रेफर केले जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित करत, त्यामागील कारणांचा शोध घेऊन स्थानिक स्तरावरच आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय काही वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल चुकीचे येत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तपासणी प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करून सर्वसामान्यांना दर्जेदार व वेळेवर उपचार मिळणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगत, प्रशासनाने आठ दिवसांच्या आत सकारात्मक आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन सादर करताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्यासह गणेश वाईरकर, गॅरी अन्ननसिएशन, विजय जांभळे, अविनाश अनावकर, अनिकेत ठाकूर, अजय जोशी, सुरज पुजारे, सागर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.