
मालवण : दिवसभर उद्घाटने, बैठका आणि प्रशासकीय कार्यक्रमांचा झंझावाती दौरा... वेळेचे बंधन... पुढील कार्यक्रमांची घाई... तरीही रस्त्यात थांबून कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान राखत "तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल?" असे म्हणत चहाचा कप स्वीकारणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्यातील माणुसकीचा पैलू शुक्रवारी पुन्हा एकदा समोर आला. खासदार नारायण राणे यांच्या या शैलीचा वारसा राणे बंधू तितक्याच आत्मीयतेने जपत आहेत.
दिवसभर कणकवली, ओरोस, कुडाळ, मालवण आणि मसूरे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, बैठका आणि प्रशासकीय कार्यक्रम पूर्ण करून महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे कणकवलीकडे रवाना झाले होते. सलग कार्यक्रमांनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता.
मसुरे येथून कणकवलीला जाताना विरण नाक्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर आपल्या सहकाऱ्यांसह स्वागतासाठी उभे होते. ताफा थांबताच त्यांनी प्रेमाने हाक मारली, "साहेब... चहा घेऊनच जा!" क्षणाचाही विलंब न करता नितेश राणे हसत म्हणाले, "तुमचा चहा टाकून कोण जाईल ?"हे शब्द कानावर पडताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. मंत्री महोदय थेट अनिल कांदळकर यांच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे याही उपस्थित होत्या. हॉटेलमधील बाकावर बसून नितेश राणे यांनी गरमागरम कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. स्थानिक ग्रामस्थांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, प्रत्येकाची विचारपूस केली आणि त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्या काही मिनिटांच्या भेटीत मंत्री नव्हे, तर घरातीलच एक व्यक्ती मिसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.यावेळी अनिल कांदळकर, माजी सरपंच आपू आंबेरकर, विलास पांजरी, अजयकुमार सर्वगोड, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब तसेच अनेक ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
राणे कुटुंबाची ओळख केवळ राजकीय नेतृत्वापुरती मर्यादित नाही. कार्यकर्त्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार आणि सामान्य माणसाशी सहज संवाद ही त्या परंपरेची खरी ताकद आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सुरू केलेला हा वारसा आज पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे त्याच आत्मीयतेने पुढे नेत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.










