LIVE UPDATES

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता

प्रकरणातील सहआरोपी विनोद तोमर यांनाही न्यायालयाकडून दिलासा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 13:56 PM
views 66  views

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या विनयभंगाच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात भाजपचे माजी खासदार व भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले. तसेच डब्लूएफआयचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही या प्रकरणातून मुक्तता केली आहे.

देशातील आघाडीच्या सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या खटल्यातील अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर  ब्रिजभूषण सिंह म्हणाले, "न्यायालयाने मला सन्मानपूर्वक मुक्त केले आहे. मी तेव्हा म्हणालो होतो की मी स्वतःला फाशी लावून घेईन. तशी वेळ आली नाही आणि आज मी न्यायालयाबाहेर पडत आहे." आरोप करणाऱ्यांविषयी किंवा राजकीय षड्यंत्राबाबतच्या प्रश्नांवर भाष्य करण्यास नकार देत माजी खासदार म्हणाले, "त्या गोष्टी जाऊ द्या; जे झाले ते झाले."

महासंघाचे कार्यालय, अधिकृत निवास्थान तसेच परदेश दौऱ्यात महिला कुस्तीपटूंचा 2016 ते 2019 यादरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर होता. विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसह अनेक कुस्तीपटूंनी २०२३ मध्ये ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई आणि अटकेची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सहा वेळा खासदार राहिलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३५४, कलम ३५४-ए, कलम ३५४-डी आणि कलम ५०६ अन्वये आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर, भाजपने ब्रिजभूषण सिंह यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली नाही. पक्षाने त्यांच्या मुलाला उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते.