
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांत पर्यावरणाला हानिकारक असा एम सॅंड (कृत्रिम वाळू) प्रकल्प आणला जात आहे. या प्रकल्पाला तालुक्यात तीव्र विरोध असून प्रशासनाने हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा. अन्यथा या प्रकल्पा विरोधात जनतेसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, गोव्यातील एका परप्रांतीय कंपनीने एम सॅंड (कृत्रिम वाळू) प्रकल्प सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली आहे. प्रशासनाने तालुक्यातील पिकुळे, बोडदे, उसप, केर गावातील सरकारी मालकीच्या गायरान जमिनीत हा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली केल्या आहेत. प्रशासनामार्फत स्थळ पाहणी सुरू करण्यासाठी प्रयत्न होता, मात्र या चारही गावांमध्ये स्थळ पाहणी करण्यासाठी गेलेले अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले व प्रकल्पांना विरोध असल्याचे स्पष्ट सांगितले. ही चारही गावात पर्यावरण दृष्ट्या संपन्न असून गायरान असलेल्या परिसरात शेती, फळबागायती मोठ्या प्रमाणावर केली आहे.
या बागायती मधूनच येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे कृत्रिम वाळू सारखे प्रकल्प येथे आल्यास पर्यावरणाचे नुकसान होऊन पाणी, सजीवसृष्टी यावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने अशा प्रकल्पांना परवानगी न देता आपल्या मालकीच्या जमिनी निश्चित करून त्या पर्यावरण पूरक व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर द्याव्यात. अशा प्रकल्पांना जनता व आम्ही सहकार्य करू. मात्र कृत्रिम वाळू सारखे पर्यावरणाला घातक प्रकल्प आणून जनतेला रस्त्यावर उतरण्यास प्रशासनाने भाग पाडू नये. कारण तालुक्यातील विविध गावात एम सॅंड (कृत्रिम वाळू) प्रकल्प आणून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाला बाधक उद्योगांची निर्मिती करण्याचा प्रशासनाचा घाट आहे आणि अशा प्रकल्पांना तालुक्यात थारा दिला जाणार नाही.
अशा प्रकल्पांना हद्दपार करण्यासाठी वेळप्रसंगी जनतेसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे शिवसेना आंदोलन करणार, असा इशारा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे. या निवेदनावर युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, युवासेना उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार, विभाग प्रमुख भिवा गवस, संतोष मोर्ये, महादेव गवस, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, महिला तालुका संघटक जेनिफर लोबो, रामा कासकर, सोमनाथ गवस, प्रदीप सावंत यांच्या सह्या आहेत.











