LIVE UPDATES

फोंडाघाट येथे कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची वाहतुक रोखली

टेम्पो चालकासह चौघांवर गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 20:57 PM
views 40  views

कणकवली : फोंडाघाट बोकल भाटले बंद वाळू मायनींग खाणीजवळ हरकुळ रोड ते देवगड-निपाणी मार्गाला मिळणाऱ्या कच्च्या रस्त्यावर फोंडाघाट येथे टेम्पोतून विनापरवाना, चारा पाण्याची सोय न करता, दाटीवाटीने कत्तलीकरता एक बैल व एक पाडा अशी दोन जनावरांची वाहतुक स्थानिक ग्रामस्थांनी रोखली. या प्रकरणी पोलिसांना माहिती देताच टेम्पोसह जनावरे ताब्यात घेत जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुक प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबतची फिर्याद निवृत्ती शांताराम नानचे (50 रा.फोंडाघाट) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांना वरील रस्त्याने काही लोक टेम्पोतुन गुरे घेऊन फोंडाघाटमार्गे कोल्हापूरकडे जाणार असल्याचे समजले. म्हणून ते त्याठिकाणी आले असता 10.30 च्या सुमारास त्यांना हरकुळ रोडकडून देवगड-निपाणी मार्गाला मिळणाऱ्या कच्चा रस्त्याने एक टेम्पो येताना दिसला. त्या गाडीमध्ये चालकाच्या बाजूला आणखी तीन लोक बसले होते. त्यांनी गाडी थांबवून गाडीत काय आहे असे विचारले असता दोन बैल असल्याचे सांगितले. खात्री करुन त्यांनी कणकवली पोलिस ठाणे येथे फोन करुन कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. यावेळी त्या गाडीतील तिघांनी गाडीचा चालक गणेश गजबार यांच्या समवेत कत्तलीकरीता जनावरे घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुरे वाहतुकीचा परवानाही नव्हता. गुरांच्या अवैध वाहतुक प्रकरणी टेम्पो व जनावरे पोलिसांनी पंचनामा करून जप्त केली. याप्रकरणी संशयित गणेश शांताराम गजबार (36), नितेश अर्जुन गजबार (30), अनंत वसंत निकम (42) आणि लक्ष्मण बापू निकम (62, सर्व रा. फोंडा तिठा)  यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.