
सावंतवाडी : मुंबई- गोवा हायवे गेली सतरा वर्षे होतच आहे. एवढा मोठा कालावधी एका सहाशे किमीच्या हायवे बांधकामासाठी लागणे हा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद होण्यासारखा विश्वविक्रम आहे असा टोला सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी लगावला. तसेच सावंतवाडीतील झाराप, इन्सुली, बांदा फ्लायओव्हर ब्रिज वाहतूकीसाठी सुरक्षित आहेत का ? असा सवाल उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, अजूनही लांजा, संगमेश्वर, चिपळूण, माणगाव अशा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक फ्लायओव्हर ब्रिजेस् चे काम अपूर्णावस्थेतच आहे. आजही मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणावे तसं ट्रॅफीक रस्त्यावर नाही. पण, गेल्या चार वर्षांत झाराप,खामदेव नाका (इन्सुली) आणि बांदा येथे फ्लायओव्हर ब्रिजेस् बांधण्याचा उपद्व्याप करण्यात आला. हे ब्रिज भविष्यात मोठ्या प्रमाणावर होऊ शकणाऱ्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा म्हणून बांधले गेले आहेत, असे कारण सांगण्यात आले होते. अजूनही हे ब्रिजेस् वाहतूकीसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. पण, त्या फ्लायओव्हर ब्रिजना ऐन पावसाळ्यात भगदाडं पडताना दिसत आहेत. ती भगदाडं लपून छपून प्लास्टरचा मुलामा करून गुपचूप बुजवण्यात येत आहेत. अशावेळी हे ब्रिजेस् खरोखरच चांगल्या प्रतीचे बांधकाम करून बांधण्यात आले आहेत का?
हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात येत आहे. देशात अनेक ठिकाणी ब्रिजेस् कोसळून अनेक गंभीर अपघात आणि मृत्यू झाल्याच्या घटना जनता दररोज बघत आहे. अशा संशयास्पद पध्दतीने बांधलेल्या या फ्लायओव्हर ब्रिजेसचे थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट होणे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी अतिशय आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग ऑथाॅरिटी, जिल्हा प्रशासनाने या गोष्टींची गंभीर दखल घेऊन सदर तीनही फ्लायओव्हर ब्रिजचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.











