
गुहागर : तालुक्यातील वेळंब गुरववाडी येथे कौटुंबिक वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मण मधुकर तांबे (वय ५२, रा. वेळंब गुरववाडी, ता. गुहागर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२६ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास लक्ष्मण तांबे यांचा त्यांचा मुलगा संकेत याच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या त्रासातून २९ जुलैच्या रात्री ११:०० ते ३० जुलैच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान लक्ष्मण तांबे यांनी राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शिवणीच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मृत व्यक्तीचे भाऊ महेश मधुकर तांबे यांनी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.














