
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळुणात मोठी कारवाई केली आहे.
पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात विनापरवाना गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५.५३२ किलो वजनाची आणि १ लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली असून, उत्तर प्रदेशातील २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात एनडीपीएस कायद्याच्या अनुषंगाने छापा टाकण्यात आला.
या ठिकाणी सॉ मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत राहणारा अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. मलापांडे, कापुरवा, पो. कुचेरा, तहसील मिल्कीपूर, पोलीस ठाणे इनायतनगर, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश) हा तरुण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाच्या (कॅनॅबिस) वनस्पतींची विनापरवाना लागवड करून त्यांची जोपासना करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष गांजाची झाडे ताब्यात घेतली. त्यांचे एकूण वजन ५.५३२ किलो असून बाजारमूल्य १ लाख ३८ हजार ३०० रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चिपळूण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नागेकर, वैभव मोरे आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांचा समावेश होता.
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे चिपळूण परिसरात अमली पदार्थांच्या बेकायदा लागवडीचा प्रकार उघडकीस आला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








