
सावंतवाडी : नदीच्या संथ लहरी, निसर्गाचा वरदहस्त आणि एका अजस्त्र खडकावर दिमाखात उभं राहिलेलं मारुतीचं मंदिर तुम्हाला माहित आहे का? कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे-पेडवेवाडी येथील हे मंदिर आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे महाराष्ट्रात का ओळखलं जातं?" या स्थानाला पांडवकालीन इतिहासाची झालर लाभल्याचं सांगितलं जातं.
१९८० मध्ये येथे छोटीशी घुमटी बांधण्यात आली; पण त्याआधीही पिढ्यानपिढ्या येथे उत्सव साजरे होत आले आहेत. पूर्वी येथे दगडाची मूर्ती होती, आणि आता नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करून ग्रामस्थ व युवकांच्या अथक मेहनतीतून हे भव्य मंदिर साकारण्यात आलंय. श्रीरामांच्या सेवेसाठी हातावर संजीवनी डोंगर घेऊन चाललेल्या मारुतीरायाचं, नदीकाठच्या खडकावर असलेलं हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मानलं जातं.
खडकावर वसलेलं हे देऊळ निसर्ग, श्रद्धा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीची जिवंत साक्ष देतं. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी येथे भक्तीचा महासागर लोटतो. 'अतिथी देवो भव' या परंपरेनुसार, दुपारी सुरू होणारी महाप्रसादाची सेवा अगदी शेवटच्या भाविकाचे दर्शन होईपर्यंत रात्री १० वाजेपर्यंत अखंड सुरू असते.
केवळ उत्सवातच नाही, तर प्रत्येक शनिवारी आणि विशेषतः श्रावणात भजनाच्या गजरात हा परिसर दुमदुमून जातो. "हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा कारिवडेचा हा मारुतीराया... तुम्ही कधी या अनोख्या मंदिराला भेट दिली आहे का?
संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








