LIVE UPDATES

Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक

दोघे गंभीर जखमी : मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे अपघात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 08:35 PM
views 208  views

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डेनजीक कोंडमळा येथे शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) पहाटे सहाच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. उतारावर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात संगमेश्वर तालुक्यातील ओझरकोंड येथील सूरज डावल (वय २५) आणि ऋतिक गिजे (वय २३) हे जखमी झाले आहेत. दोघेही मुंबईहून आपल्या गावी दुचाकीने जात असताना कोंडमळा येथील उतारावर हा अपघात घडला.

धडकेची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीचे नुकसान झाले असून दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, महामार्गावर विशेषतः उताराच्या भागात अवजड वाहने उभी करण्याच्या प्रकारामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पहाटेच्या वेळी कमी दृश्यमानतेमुळे रस्त्याच्या बाजूला उभी असलेली वाहने धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहने उभी करताना योग्य खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

या प्रकरणी जखमी सूरज डावल यांचे काका संजय सखाराम डावल यांनी फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत सावर्डे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.