LIVE UPDATES

Devgad Fake Pesticide Stock : अडीच कोटींच्या औषधसाठ्याचे रहस्य उलगडणार कोण? बागायतदारांचा कृषी यंत्रणेला सवाल

बोगस कीटकनाशकांच्या संशयाने देवगडमध्ये खळबळ : काका ढोके यांची पत्रकार परिषदेत माहिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 07:26 PM
views 119  views
Devgad mango and cashew farmers protest against suspected fake pesticide and fungicide stock in Sindhudurg.

देवगड : आंबा-काजू हंगामाच्या तोंडावर देवगड तालुक्यात संशयास्पद कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या विक्रीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये किमतीचा संशयास्पद औषधसाठा १२ चाकी ट्रकमधून देवगडमध्ये उतरविण्यात आल्याची माहिती देऊनही कृषी विभागाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आंबा, काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, ज्या साठ्याची माहिती कृषी विभागाला देण्यात आली होती, तोच साठा दोन दिवसांत गायब झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन २ डिसेंबरपर्यंत कारवाई करावी, अन्यथा ३ डिसेंबर रोजी आंबा परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देवगड तहसीलदार कार्यालय किंवा कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

शनिवारी सायंकाळी देवगड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत काका ढोके बोलत होते. यावेळी गणेश गावकर, गणेश वाळके आणि प्रशांत शिंदे उपस्थित होते.

काका ढोके म्हणाले की, आठ दिवसांपूर्वी देवगडमधील एका बागेत १२ चाकी ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद औषधांचा साठा उतरविला जात असल्याची गुप्त माहिती संघटनेला मिळाली होती. त्यानुसार देवगड कृषी कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आली. ही माहिती गोपनीय ठेवण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र, ओरोस येथून भरारी पथक येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्यक्षात दोन दिवसांनंतर बागायतदारांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता तेथून संपूर्ण माल गायब झाल्याचे आढळले. कृषी कार्यालयातूनच माहिती फुटल्यामुळे संबंधितांनी औषधसाठा अन्यत्र हलविल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

अधिकृत कृषी सेवा केंद्रांऐवजी थेट बागेत औषधसाठा उतरविण्यात आल्याने या मालाच्या वैधतेबाबत संशय निर्माण झाला आहे. सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांच्या या साठ्यामागे दोन-तीन मोठ्या दुकानदारांचे रॅकेट असून, त्यामागे एक 'गॉडफादर' कार्यरत असल्याचा आरोप ढोके यांनी केला.

शनिवारी कातवण येथील एका दुकानावर झालेली कारवाई ही केवळ दिखावा असल्याचे सांगत मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बहुतांश कृषी सेवा केंद्रांबाहेर शिल्लक औषधसाठ्याचे फलक लावलेले नसतानाही संबंधितांवर कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मागील हंगामात हवामानातील बदल आणि बोगस औषधांच्या वापरामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाही आंब्याला मोहोर येण्यापूर्वीच बनावट औषधांच्या विक्रीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहनही ढोके यांनी केले.

यावेळी गणेश गावकर यांनी औषध विक्रेत्यांच्या दुकानांबरोबरच त्यांची गोडाऊनही नोंदणीकृत असणे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, देवगड तालुक्यात अनेक अनधिकृत गोडाऊनमध्ये औषधांचा साठा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

विक्रेत्यांची युनियन करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ज्या विक्रेत्यांकडे सर्वाधिक अनधिकृत गोडाऊन आहेत, त्यांची माहिती संघटनेने यापूर्वीच कृषी विभागाला दिली होती असे असतानाही त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यापूर्वी तालुक्यातील तीन औषध विक्रेत्यांकडील 'कल्टार'सह अन्य औषधांचे नमुने बोगस असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले होते. मात्र, संबंधित विक्रेत्यांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याचा खुलासा कृषी विभागाने करावा, अशी मागणी गावकर यांनी केली.

बोगस औषधांची आवक सिद्ध होऊनही कृषी कार्यालय कारवाईस टाळाटाळ का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करत बागायतदारांच्या नुकसानीला औषध विक्रेते आणि कृषी विभाग जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. दोन ते अडीच कोटी रुपयांचा संशयास्पद औषधसाठा कुठे गेला, त्याची आवक कोठून झाली आणि त्यामागे कोण आहेत, याचा शोध घेऊन संबंधित साठा जप्त करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

२ डिसेंबरपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास ३ डिसेंबर रोजी आंबा परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देवगड कृषी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा काका ढोके यांनी दिला.