
देवगड : शासकीय सेवेत कार्यरत असताना शासनाच्या विरोधात आक्षेपार्ह मोबाईल स्टेटस ठेवणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव देवगड पंचायत समितीच्या मासिक सभेत एकमुखी घेण्यात आला. तसेच इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी तात्काळ वीज जोडणी देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा सूचना सभापती गणेश राणे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
देवगड पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, ज्येष्ठ पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, विष्णू घाडी, सादिक डोंगरकर, रवींद्र तिर्लोटकर, अंकुश ठुकरुळ, शितल तावडे, समृद्धी चव्हाण, संजना लाड, स्नेहा अनुभवणे, सलोनी तळवडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईस्थित चाकरमान्यांसाठी एसटी विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. याबाबत आतापासूनच मुंबईहून देवगडकडे येणाऱ्या तसेच परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे नियोजन करावे, अशी सूचना सभापती गणेश राणे यांनी केली. तसेच तीर्थक्षेत्रांसाठी प्रवाशांची मागणी असल्यास जादा गाड्यांची उपलब्धता, वेळापत्रक व इतर माहिती प्रसिद्ध करून त्याची प्रत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
“गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी एसटी आहे. एसटीला आपले घर समजून काम करा, तरच आगार व्यवस्थित चालेल,” अशा शब्दांत सभापती गणेश राणे यांनी देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर व विजयदुर्ग आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतावडेकर यांची कानउघाडणी केली.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला असलेली झाडी कटिंग तसेच खड्डे बुजविण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत. मात्र ही कामे करताना संबंधित ठेकेदारांनी त्या-त्या ग्रामपंचायतींना पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे, अशी सूचना उपसभापती अमोल लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
खासदार व आमदारांना शासनाकडून पेन्शन दिली जाते. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दहा ते पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही पेन्शन सुरू करण्याबाबत शासनाने विचार करावा, अशी मागणी ज्येष्ठ सदस्य सदाशिव ओगले यांनी केली. यावर सभागृहात एकमुखी ठराव घेण्यात आला.
आंबा नुकसानभरपाईसाठी तालुक्यातील ८ हजार ७६३ खातेदारांची ऑनलाइन नोंदणी झाली असून, २० कोटी २१ लाख ७५ हजार ७९ रुपयांच्या नुकसानभरपाईची केवायसी प्रक्रिया झाल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी सभागृहात दिली. मात्र शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकापुढे शून्य लावण्याची आवश्यकता असल्याची माहिती कृषी विभागाकडून वेळेत देण्यात आली नसल्याने केवायसी प्रक्रियेला विलंब होत असल्याचे सदाशिव ओगले यांनी निदर्शनास आणून दिले.
देवगड-जामसंडे शहरातील एकूण नऊ अंगणवाड्यांची सध्या दुरवस्था झाली असून, त्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. या कामांची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. यातील दोन अंगणवाड्यांची स्थिती धोकादायक असल्याचे सभापती गणेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. टेंडर झालेली कामे वेळेत पूर्ण होणार की नाही, याची माहिती देणारी यादी पंचायत समितीला देण्यात यावी, जेणेकरून संबंधित ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देता येतील, असे त्यांनी सांगितले.
सदस्या समृद्धी चव्हाण यांनी वेळगिवे येथील अंगणवाडी मदतनीस महिलेबाबत प्रश्न उपस्थित केला. संबंधित महिला केवळ दोन महिने काम करून सध्या मुंबईत नोकरी करत असून अंगणवाडीत अनुपस्थित आहे. असे असतानाही तिच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. हे पद रिक्त केले असते तर स्थानिक महिलेला रोजगाराची संधी मिळाली असती, असेही त्यांनी सांगितले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मान्य करत संबंधित महिलेला पत्र देण्यात आले असून, तिने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. तिला पुन्हा स्मरणपत्र पाठवून त्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
देवगड अर्बन बँकेसमोरील पंचायत समितीच्या जागेची स्वच्छता व योग्य नियोजन करून देवगड आठवडा बाजाराच्या दिवशी गावठी रानभाजीचा बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती सभापती गणेश राणे यांनी दिली.
तसेच देवगड-जामसंडे शहरात पंचायत समितीच्या नावे असलेल्या सर्व शासकीय जागांची मोजणी करून त्या ठिकाणी मालकी दर्शविणारे फलक लावावेत, अशी सूचना उपसभापती अमोल लोके यांनी कक्ष अधिकाऱ्यांना केली. समाजकल्याण विभागाच्या देवगड शहरातील ३४ गुंठे जागेची मोजणी करून त्या जागेला कंपाउंड वॉल करण्यात यावी, अशी मागणी सदस्या सलोनी तळवडेकर यांनी केली.
गणेश चतुर्थीच्या काळात तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत राहील, याकडे वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज व व्यवस्थित असली पाहिजे. वीज व आरोग्य या दोन्ही विभागांबाबत गणेशोत्सव काळात कोणतीही तक्रार निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना सभापती गणेश राणे यांनी दिल्या.
यावेळी उपस्थित सदस्य रवींद्र तिर्लोटकर, संजना लाड, शितल तावडे, सादिक डोंगरकर यांनीही आपल्या भागातील प्रश्न अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. हे सर्व कामे पूर्ण केली जातील असे अधिकारी वर्गाच्या वतीने सांगितले.
एक सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन : सभापती गणेश राणे
देवगड तालुक्यातील वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांच्या मालकीच्या दयनीय झालेल्या रस्त्यांसह गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांवर १ सप्टेंबर रोजी देवगड पंचायत समितीच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी मासिक सभेत दिली.










