
सिंधुदुर्गनगरी : कारखाली अडकला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कुटुंबीयांच्या डोळ्यांत त्याच्या जगण्याची आस होती. मात्र मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अखेर सोमवारी (२४ ऑगस्ट) पहाटे संपली. अपघातात जखमी इंद्रजीत बोडेकर (२३) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी देवगडमधील फणसगाव येथे अंत्यसंस्कार होताना कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडा येथे १८ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात इंद्रजीत गंभीर जखमी झाला होता. इंद्रजीतवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. नंतर तेथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याची प्रकृती सुधारली नाही.
अखेर सोमवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. इंद्रजीतच्या मृत्यूची बातमी कळताच बोडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज देवगड येथील त्याच्या गावी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबाची आशा अखेर मावळली
अपघातानंतर इंद्रजीतला वाचविण्यासाठी कुटुंबीयांसह डॉक्टरांनीही मोठी धडपड केली. शस्त्रक्रियेनंतर तो बरा होईल, अशी आशा कुटुंबीयांना होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तरुण वयात इंद्रजीतचा मृत्यू झाल्याने देवगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.










