LIVE UPDATES

दत्तमाऊली दशावतार 'कला तपस्वी' पुरस्कार प्रदान

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 25, 2026 18:13 PM
views 86  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळातर्फे देण्यात येणार कला तपस्वी पुरस्कार यावर्षी मरणोत्तर पुरस्कार म्हणून कै. जयसिंग बळीराम राणे, रेडी यांना प्रदान करण्यात आला. तर यावर्षीचा कला तपस्वी पुरस्कार ओटवणेतील आना उर्फ नाना धोंडीराम गावकर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ गेली सहा वर्ष सातत्याने नवोदित कलाकारांसाठी प्रशिक्षण वर्ग राबवते. यावर्षीही या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी 60 प्रशिक्षणार्थींनी सहभाग दर्शविला होता. विशेष म्हणजे यावर्षी महिला प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. 

हा प्रशिक्षण वर्ग वालावल -हूमरमळा  येथील रामेश्वर मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ तालुका माजी पंचायत समिती सभापती संजय वेंगुर्लेकर यांच्या हस्ते झाले. हा प्रशिक्षण वर्ग राबविताना संस्था जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकारांना प्रशिक्षक म्हणून पाचारण करते. त्यांच्याकडून नवीन होतकरू कलाकारांना शिक्षण दिले जाते. यातून हे कलाकार दशावतारात आपल्या भूमिका समृद्धपणे साकारतात. दरवर्षी स्वखर्चाने अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येतात.  यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगीत विभागासाठी मयूर गवळी (हार्मोनियम), चंद्रकांत खोत (पखवाज) आणि बाबू कोरगावकर (ताल रक्षक) यांनी जबाबदारी अत्यंत सुंदर रित्या पार पाडली. अभिनयासाठी सुरेश धुरी (माणगाव), आप्पा दळवी (हुमरट), महेश गवंडे (मठ), विलास खानोलकर (तेंडुलकर ) तेंडोली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हार्मोनियम वादक मयूर गवळी  आणि पखवाज वादक चंद्रकांत खोत यांनी जुन्या दशावतारामध्ये आणि आधुनिक दशावतारामध्ये नेमका काय फरक आहे ? ते समजावून सांगत ही कला टिकून ठेवत सातासमुद्रापार कशी जाईल यासाठीच्या बारकाव्यांचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सुरेश धुरी यांनी स्त्री अभिनयाचे कंगोरे सर्वांसमोर मांडून प्रशिक्षणार्थींची मने जिंकली. महेश गवंडे यांनी गदा कशी फिरवावी ? तिचा वापर कसा करावा, शब्दफेक कशी असावी शब्दांमध्ये जरब कशी आणावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. अभिनयाचे मार्गदर्शन आप्पा दळवी यांनी प्रवेश सादर करून बारकावे समजावले. तर नटखट श्रीकृष्ण कसा असावा आणि वाकचातुर्य कसे असावे याबाबत विलास खानोलकर (तेंडोलकर) यांनी मार्गदर्शन केले. या सर्व मार्गदर्शकांचे प्रवेश सादरीकरण बघताना प्रशिक्षणार्थी आणि उपस्थित सर्व भारावून गेले होते.

या प्रशिक्षण वर्गाच्या समारंभाच्यावेळी दत्तमाऊली पारंपरिक शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत देण्यात येणारा कला तपस्वी हा दशावतारातील अतिशय मानाचा समजला जाणारा पुरस्कार बहाल केला. मरणोत्तर पुरस्कार म्हणून कै. जयसिंग बळीराम राणे, रेडी यांना तर यावर्षीचा कला तपस्वी पुरस्कार ओटवणेतील आना उर्फ नाना धोंडीराम गावकर यांना प्रदान करण्यात आला. मरणोत्तर पुरस्कार स्वीकारताना  कै. जयसिंग भाऊ राणे यांच्या कुटुंबाचे डोळे त्यांच्या आठवणीने पाणावले. कै. राणे यांच्या कुटुंबीयांनी पुरस्काराची रक्कम गरजवंतांना देण्यास मंडळाकडे सुपुर्द केली असता अपघातग्रस्त पपू मेस्त्री राठीवडे यांना ती देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रेमानंद देसाई, बाबल वालावलकर, मामा माळकर,अरविंद करलकर, देवेंद्र नाईक, विजय शृंगारे, प्रकाश परब, अतुल बंगे, हुमरमाळा सरपंच अमृत देसाई, धोंडू रेडकर तसेच सर्व प्रशिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी दत्ता सामंत म्हणाले की, दत्तमाऊली परिवाराचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने होत राहिले पाहिजेत. त्यामुळे दशावताराचे संवर्धन आणि बारकावे लोकांपर्यंत पोहोचतील. शिवाय नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि दशावतार अधिक समृद्ध होईल. पुढीलवर्षी प्रशिक्षण वर्ग हा आपल्या गावी म्हणजेच घुमडे येथे आयोजित करावा, त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य आपण करू असा विश्वास व्यक्त केला. तर सिंधुदुर्गातील सर्व ज्येष्ठ कलाकार आणि जिल्ह्यातील किमान ५०० नवोदित आणि होतकरू कलाकार या प्रशिक्षणास उपस्थित राहतील आणि आपली कला समृद्ध करण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. दशावतार कलाकारांना न्याय मिळवण्यासाठी सातत्याने कलाकारांसोबत उभे राहू अशी  ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, कै. जयसिंग राणे यांनी केलेल्या कार्याचा त्यांच्या अजरामर भूमिकांचा त्यांच्या पदन्यासाचा आणि वक्तृत्वाचा लोकांना आजही विसर पडलेला नाही. अनेक कलाकार त्यांनी घडवले असून  त्यांच्या रूपाने कै. जयसिंग भाऊ राणे यांची कला आजही जिवंत आहे असे मत संस्था सचिव दत्तप्रसाद शेणई यांनी व्यक्त केले.

तर यावर्षीचा कला तपस्वी पुरस्कार प्राप्त आना उर्फ नाना गावकर म्हणाले की, कलाकाराने नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवावे. प्रसिद्धीच्या अतिउच्च शिखरावर असताना खाली डोकावून पहावे. तरच आपली कला आपल्या सोबत सातत्याने बहरत राहते‌‌. आपली निरीक्षणशक्ती जर जागृत असेल तर आपण महान कलाकार बनू शकता, असा कानमंत्र त्यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना दिला. दत्तमाऊली परिवाराने केलेला सन्मानासाठी आपण कायम ऋणी राहू असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार भीष्माचार्य यशवंत तेंडोलकर, कुडाळ तालुका दशावतार संघटना अध्यक्ष चारु तेंडोलकर, कणकवली संघ अध्यक्ष गुरु मेस्त्री, कलावंत सुरेश गुरव,

 दत्तमाऊली पारंपरिक दशावतार शिक्षण प्रशिक्षण नाट्य मंडळाचे अध्यक्ष बाबा मयेकर, सचिव दत्तप्रसाद शेणई, उपाध्यक्ष शिवप्रसाद मेस्त्री, खजिनदार  स्वप्निल नाईक, मोरेश्वर सावंत, सदानंद केळुसकर, रामचंद्र रावले, निखिल निकम, न्हानू कोरगावकर , रुपेश नेवगी, सुयश ठाकूर, अनिकेत गुळेकर, समीर आपटे, आत्माराम मुणनकर, प्रथमेश सावंत, किरण सावंत आदी उपस्थित होते‌. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर सावंत यांनी केले. तर आभार रुपेश नेवगी यांनी मानले.