
सिंधुदुर्गगरी : ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील महामार्गावरील धोकादायक वळणे, निकृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि सर्व्हिस रोडवरील अपघातांचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी सातत्याने लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तावडे यांच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून, संबंधित ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत.
महामार्गावरील भरधाव वाहने नियंत्रण सुटल्यास थेट सर्व्हिस रोडवर येण्याचा धोका निर्माण होत असल्याने तावडे यांनी जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. महामार्ग आणि सर्व्हिस रोडच्या मध्ये मजबूत सुरक्षा व्यवस्था उभारावी, धोकादायक वळणांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. तावडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सुरू असलेल्या कामाची तावडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेत काम दर्जेदार आणि कायमस्वरूपी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांकडे केल्या.
तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करा:
महामार्गावरील धोकादायक ठिकाणी केवळ तात्पुरती उपाययोजना न करता मजबूत आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी. भविष्यात अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी महामार्ग प्रशासनाने उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी तावडे यांनी केली. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लावून धरत केलेल्या पाठपुराव्याला अखेर प्रत्यक्ष कामाच्या रूपाने यश मिळाल्याने ओरोस परिसरातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.












