LIVE UPDATES

कृषी विभागाचा धडक छापा !

अवैध सेंद्रीय खताचा ५७ हजारांचा साठा जप्त
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 10, 2026 21:29 PM
views 37  views

ट्रकही ताब्यात, देवगडात खळबळ

देवगड : देवगड तालुक्यातील वाडा येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या सेंद्रीय खताच्या साठ्यावर तालुका कृषी विभागाने बुधवारी सायंकाळी धडक कारवाई करत सुमारे ५७ हजार रुपये किमतीचे खत आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त केला. तसेच संबंधित गोडावून सील करण्यात आले असून या कारवाईमुळे देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका कृषी विभागाला अवैध खतसाठ्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास वाडा आंबेडकर चौक परिसरात कृषी विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली.

यावेळी गोडावूनसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून सेंद्रीय खताची पोती उतरवून गोडावूनमध्ये साठविण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान संबंधित खतसाठा विनापरवाना वाहतूक करून साठविण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर कृषी विभागाने तत्काळ कारवाई करत सुमारे ५७ हजार रुपये किमतीच्या सेंद्रीय खताच्या १०० पोत्यांचा साठा जप्त केला.

याशिवाय, खत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही कृषी विभागाने ताब्यात घेतला आहे. अवैध खतसाठा आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी वाडा येथील सत्यवान परशुराम परब यांच्याविरोधात नियमानुसार कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.