LIVE UPDATES

वेताळ बांबर्डे-पावशी सीमेवरील महामार्गावर जीवघेणा खड्डा

अपघाताला आमंत्रण : ​ठेकेदाराचे दुर्लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 21:01 PM
views 27  views

कुडाळ : ​वेताळ बांबर्डे-पावशी सीमेवर मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या दिशेने जाताना एक मोठा आणि अत्यंत धोकादायक खड्डा पडला आहे. हा खड्डा अत्यंत खोल असून येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे महामार्ग ठेकेदाराचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

​वेताळ बांबर्डे ओव्हरब्रीज सोडल्यानंतर कुडाळच्या दिशेने जाताना हा खोलवर खड्डा तयार झाला आहे. खड्ड्यातील आतील खडी बाहेर उघडी पडून ती महामार्गावर पसरली आहे. विशेष म्हणजे, हा खड्डा चालत्या वाहनांमधील चालकांना लांबून दिसत नाही, ज्यामुळे वाहन अचानक खड्ड्यात आपटून मोठे अपघात होऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी एका दुचाकीस्वाराला खड्ड्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये सदर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता.

​मुख्य म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच संबंधित ठेकेदाराने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले होते. परंतु काही दिवसांतच त्या खड्ड्यांची स्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. महामार्गावरील खड्ड्यांचा हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, ठेकेदार केवळ तात्पुरती मलमपट्टी करून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. अशा जीवघेण्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, प्रशासनाने आणि ठेकेदाराने यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.