LIVE UPDATES

कणकवलीत अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जवर कारवाई

प्रिंटिंग प्रेस व राजकीय पक्षांना नगरपंचायतीची नोटीस
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 11:20 AM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात येणारे जाहिरात फलक, घोषणाफलक, बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज यांच्याविरोधात नगरपंचायतीने कठोर भूमिका घेतली असून लवकरच विशेष कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात शहरातील प्रिंटिंग प्रेस चालक तसेच विविध राजकीय पक्षांना नगरपंचायतीकडून अधिकृत पत्र देण्यात आले आहे.

मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. १५५/२०११ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.

नगरपंचायतीच्या निर्देशानुसार कोणतेही जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स किंवा होर्डिंग्ज छापण्यापूर्वी संबंधित ग्राहकाकडे कणकवली नगरपंचायतीकडून IWBP प्रणालीद्वारे जारी करण्यात आलेला ना-हरकत परवाना (NOC) आणि अधिकृत QR कोड असणे बंधनकारक आहे. हा QR कोड संबंधित जाहिरात किंवा बॅनरवर स्पष्टपणे दर्शविणे आवश्यक राहणार आहे.

राष्ट्रीय सण, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनर, फ्लेक्स किंवा होर्डिंग्जवर परवानगी व QR कोड नसल्यास ते छापू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रिंटिंग प्रेस चालकांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित जाहिराती अनधिकृत ठरवून त्या तात्काळ हटविण्यात येतील.

नगरपंचायतीने दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पावसाळ्यात जोरदार वारे, मुसळधार पाऊस, वादळ किंवा संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या काळात धोकादायक बॅनर व होर्डिंग्ज नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण करू शकतात. तसेच रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा, अपघात तसेच वीज तारा व खांबांवर पडल्यास शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता वाढते.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायत क्षेत्रातील सर्व धोकादायक बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज तात्काळ काढून सुरक्षितता उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच परवानगीशिवाय बॅनर किंवा होर्डिंग्ज छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवरही दंडात्मक कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.